

अमरावती : शहरातील गजबजलेल्या इर्विन चौकात लांडगा दिसल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही नागरिकांना हा वन्यप्राणी फिरताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर याची माहिती पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाला याबाबत कळविण्यात आल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली आहे. लांडगा गर्दीच्या ठिकाणी कसा पोहोचला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इर्विन चौकातील सुरज रिफ्रेशमेंटच्या बाजुला असणा-या खुल्या प्लॉटमधून श्वानासारखा एक प्राणी नागरिकांना दिसला. परंतू तो श्वान नसल्याची शंका बळावली. त्यामुळे हा प्राणी लाडंगाच असल्याचे मत नागरिकांचे झाले. मात्र या ठिकाणी लाडंगा येणे शक्य नाही, असेही काहींचे मत होते. मात्र तो एखाद्या अज्ञात मार्गाने शहरात भटकत आला असावा.
तो गेल्या काही दिवसांपासून इर्विन चौकातच वास्तव्यास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले असून, सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत अमरावतीत वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहेत. यापूर्वी शहरालगतच अनेकदा बिबटचे दर्शन झाले आहे, तर व्हीएमव्ही परिसरात सुध्दा बिबट्याने ठाणे मांडला होता. आता लांडगा शहराच्या हृदयस्थानी दिसल्याने वन्यजीवांच्या हालचाली वाढत असल्याची चर्चा आहे.
वनविभागाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, मात्र काळजीपूर्वक वागण्याचे आवाहन केले आहे. लांडगा पुन्हा दिसल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. या अनपेक्षित घटनेने शहरात भीतीसोबतच उत्सुकताही आहे.