अमरावती : हार्वेस्टरची दुचाकीला धडक; तरूण ठार

केमिकलची राख डोळ्यात गेल्याने अपघात
  Amravati Accident News
हार्वेस्टरची दुचाकीला धडक; तरूण ठार File Photo
Published on
Updated on

अमरावती : नागपुर-अमरावती महामार्गावर वाहनचालकांच्या डोळ्यात केमिकलयुक्त राख शिरत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे एका २८ वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले. नांदगाव पेठ बस स्टॅन्डवर मंगळवारी (दि.८) दुपारी दीडच्या सुमारास वाहनातील राख हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात शिरली. त्यामुळे हार्वेस्टर अनियंत्रित होऊन त्याने दुचाकी चालकास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ऋषिकेश सुभाष निंभोरकर (वय २८, रा. नांदुरा बु.) हा युवक जागीच ठार झाला. घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालयासमोर आक्रोश केला. राखेच्या वाहनांवर कारवाईची मागणी रेटून धरत मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, ऋषिकेश निंभोरकर हा बिझिलँड येथील एटीएमवर काम करत होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तो कामावरून नांदुरा बु. येथे दुचाकीवरून जात होता. या दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात भरधाव वाहनातील राख उडाल्यामुळे हार्वेस्टर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याची दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात ऋषिकेश जागीच ठार झाला. अपघातानंतर हार्वेस्टर चालकाने तेथून पळ काढला. घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी हार्वेस्टर चालकाला ताब्यात घेतले. ऋषिकेशचा मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी शवविच्छेदनगृहासमोर आक्रोश करत मृतदेह उचलण्यास मनाई केली. ऋषिकेश हा प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता असल्याने प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू व प्रहार कार्यकर्ते शवागृहाजवळ पोहचले. छोटू महाराज वसू यांनी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून पोलीस आयुक्तांची भेट घेतली. व राखेच्या वाहनांवर प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला.

वृद्ध वडिलांचा आधार गेला

ऋषिकेशच्या आईचे निधन झाल्यामुळे ऋषिकेश आणि त्याचे वृद्ध वडील हे दोघेच राहत होते. ऋषीकेश हा वडिलांचा एकुलता एक आधार होता. आपली नोकरी सांभाळून आपल्या वडिलांचा सांभाळ तो करत होता. मात्र तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे वृद्ध वडिलांचा आधार हिरावला गेला.

दुचाकी चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

रतन इंडियामधील राखेमुळे अनेक दुष्परिणाम उद्भवत आहेत. याचा त्रास दुचाकी चालकासह ट्रॅक्टर चालकांना होत आहे. जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, प्रदूषण विभाग,उत्खनन विभाग यांना दिलेल्या आहेत. मात्र केवळ तक्रारीपुरती कार्यवाही करायची आणि नंतर आपले हात झटकायचे असा काहीसा प्रकार संबंधित विभागाकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news