अमरावती : अचलपूर तालुक्यातील दारापूर शेतशिवार परिसरात हरम रोडवर गुरुवारी (दि.२६) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सवाईपूरा येथील शेतकऱ्याचा काढणीला आलेला सुमारे दोन एकर गहू जळून खाक झाला, तर दुसऱ्या एका शेतकऱ्याचे थ्रेशर मशीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितेश सोनवणे यांचे दारापूर शेतशिवारातील हरम रोडलगत शेत असून गुरुवारी गव्हाच्या पिकाची काढणी सुरू होती. याच दरम्यान अचानक आग लागली. कोरडे पीक आणि वार्याचा वेग जास्त असल्याने आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता दोन एकरमधील उभा गहू पूर्णपणे जळून खाक झाला. आग लागली तेव्हा शेतात असलेले अनुप काळे यांचे थ्रेशर मशीनही आगीच्या विळख्यात सापडले आणि ते पूर्णतः जळून भस्म झाले. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक हाताशी येत असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी सोनवणे यांचे मोठे नुकसान झाले असून थ्रेशर जळाल्याने शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अनुप काळे यांच्या उपजीविकेवरही संकट आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी तसेच अचलपूर नगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या घटनेचा महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून बाधित शेतकरी व श्रेशर मालकास शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.