

Daryapur Jewellery Shop Robbery
अमरावती : अमरावती जिल्ह्यात दर्यापुरात शनिवारी (दि.३१) रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास भरवस्तीत धाडसी दरोड्याची घटना घडली. शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स या सराफा दुकानात ३ ते ४ अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवत सुमारे ५०० ग्रॅम सोने व १३ किलो चांदी असा मोठा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोर पांढर्या रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी थेट सराफा दुकानात प्रवेश करून तेथील कर्मचारी व उपस्थित ग्राहकांना बंदूक व चाकूचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी काही मिनिटांतच दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आपल्या ताब्यात घेतले आणि कोणालाही सावरायची संधी न देता भरधाव कारने घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू असून आरोपींचा मार्ग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरासह आजूबाजूच्या भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.
भरवस्तीत आणि गजबजलेल्या परिसरात एवढ्या धाडसी पद्धतीने दरोडा टाकण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापार्यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत सराफा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या मुद्देमालाची अचूक किंमत व दरोडेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.