

अमरावती : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले असून, पोटच्या मुलानेच आईवर कुर्हाडीने सपासप वार करून तिला यमसदनी धाडले. ही थरारक घटना गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलवस्तू नगर येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव भारती दीपक काळे (वय ४६) असून, आकाश दीपक काळे (२७) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शनिवारी (दि. २५) रात्री ८ वाजेच्या सुमारास भारती आणि आकाश यांच्यात घरगुती कारणावरून जोरदार भांडण झाले. वादाच्या भरात रागावरचे नियंत्रण सुटलेल्या आकाशने घरात असलेली कुर्हाड उचलली आणि आईवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात भारती काळे या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
हल्ला केल्यानंतर आरोपी आकाश घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या भारतीने तातडीने आपल्या मुलीला आणि जावयाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान रविवारी दि.२६ एप्रिल रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी मुलगा आकाश काळे याला अटक केली आहे. पोलीस कोठडीत त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, तो व्यवसायाने हॉटेल व केटरिंगमध्ये 'कूक' म्हणून काम करतो. परिसरात क्षुल्लक वादातून जन्मदात्या आईचा बळी घेणार्या मुलाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गाडगे नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.