Amravati Crime : अमरावतीत भरचौकात थरार: नागपुरातील इसमाची दोन अल्पवयीनांकडून निर्घृण हत्या; दोघेही ताब्यात

Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील मुख्य बाजार चौकात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी एका ४२ वर्षीय इसमाची चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी (दि. ३०) घडली. भरदिवसा मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नईम शहा तुराब शहा (वय ४२, रा. गिट्टीखदान, नागपूर) असे मृत इसमाचे नाव आहे. नईम हा गेल्या चार महिन्यांपासून खल्लार येथील समिना परवीन अमीन शहा या महिलेच्या घरी राहत होता. समिनाचा पती अमीन शहा याला नईम वारंवार मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून अमीन शहा घर सोडून निघून गेला होता.

दरम्यान, आज दुपारी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी फिल्मी स्टाईलने मुख्य बाजार चौकात नईमवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी दोन्ही बालकांना ताब्यात घेतले असून, हत्येचे नेमके कारण काय याचा पुढील तपास ठाणेदार अमोल मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पळून जाण्याचा प्रयत्न फसला

नईमवर चाकूने हल्ला सुरू असतानाच खल्लार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख नूर हे कर्तव्यावर जात होते. हा प्रकार नजरेस पडताच त्यांनी तात्काळ दुचाकी थांबवून आरोपींच्या दिशेने धाव घेतली; मात्र गर्दीचा फायदा घेत ते पसार झाले. तेवढ्यात तेथे पोहोचलेले पोलीस हवालदार अमोल कथलकर यांना घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी शेख नूर यांच्यासह आरोपींचा पाठलाग सुरू केला.

घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पोलीस हवालदार व्यंकटेश नाकील यांच्या मदतीने पळून जाणाऱ्या दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले.

दरम्यान, हत्येनंतर पळून जाताना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला चाकू चंद्रभागा नदीच्या पुलावरून पात्रात फेकून दिला होता. पोलिसांनी नदीपात्रातून तो चाकू शोधून जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news