Amravati Crime : पोलिस कर्मचारीच निघाला गुटखा तस्कर! अमरावती पोलिस आयुक्तालयातील कर्मचार्‍याला अटक

Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

अमरावती : प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अमरावती शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याला अटक केली आहे. शेन्दुरजना घाट पोलिसांनी पुसला-पांढुर्णा मार्गावरील नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली. विशेष म्हणजे आरोपी हा पोलिस विभागातील कर्मचारीच असल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाबराव दंडे यांना मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खेप आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शेन्दुरजना घाट पोलिसांनी पुसला-पांढुर्णा रोडवरील टोल नाक्यावर नाकाबंदी करून सापळा रचला.

नाकाबंदी दरम्यान एमएच-२७-डीडी-१७३० क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार संशयावरून अडविण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.

वाहन चालकाची चौकशी केली असता तो पंकज सुधाकर दवंडे (रा. बडनेरा) असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात तो अमरावती शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीकडून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहन असा एकूण ६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. माहितीनुसार, पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी नुकत्याच १५७ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये पंकज दवंडे याची आरसीपी (दंगा नियंत्रण पथक) येथून पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. बदलीनंतर काही दिवसांतच त्याच्यावर गुटखा तस्करीप्रकरणी कारवाई झाल्याने पोलिस वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणी शेन्दुरजना घाट पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून ही खेप नेमकी कुठून आणण्यात आली, तिचा पुरवठा कोणाला होणार होता, तसेच या तस्करीमागे आंतरराज्यीय साखळी कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news