Amravati crime | इंजिनीअरिंग विद्यार्थ्याची सोशल मीडियावर बदनामी; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

सुरुवातीला परिस्थिती सुधारेल या अपेक्षेने तरुणाने तक्रार करण्याचे टाळले, मात्र, त्रास वाढत गेल्याने अखेर त्याने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली
Social Media
Social Media Pudhari
Published on
Updated on

अमरावती : सोशल मीडियाचा गैरवापर करून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. संबंधित तरुणाच्या नावाने बनावट फेसबुक व इंस्टाग्राम खाते तयार करून त्याच्या आईचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्यात आल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी (दि.२४) २१ वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा सध्या नागपूर येथे इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपी तरुणीशी त्याची ओळख इयत्ता नववीपासून ट्युशन क्लासमध्ये झाली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही ओळख त्रासाचे कारण ठरली. फेब्रुवारी २०२६ पासून संबंधित तरुणीने तरुणावर सतत संपर्क ठेवण्यासाठी आणि फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.

तरुणाने या दबावाला नकार दिल्यानंतर तरुणीने सूडबुद्धीने वागत त्याच्या नावाने फेसबुक व इंस्टाग्रामवर बनावट खाती उघडली. या खात्यांवरून तरुणाच्या आईचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले. तसेच कुटुंबीयांविषयी अश्लील मजकूर लिहून ते नातेवाईकांमध्येही प्रसारित करण्यात आल्यामुळे कुटुंबाची सामाजिक बदनामी झाली आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. सुरुवातीला परिस्थिती सुधारेल या अपेक्षेने तरुणाने तक्रार करण्याचे टाळले.

मात्र, त्रास वाढत गेल्याने अखेर त्याने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी तरुणीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२), ३५१ (२) (३) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (अ) आणि ६६ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत असून, संबंधित बनावट सोशल मीडिया खात्यांचा तांत्रिक मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news