

अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध गुन्हे शाखेने एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. रविवारी (दि. ८) सायंकाळी करण्यात आलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल २ किलो ८० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ३ कोटी १ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून ड्रग्ज माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लालखडी परिसरात रचला सापळा
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना लालखडी परिसरातून अमली पदार्थांची मोठी खेप शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लालखडी–सुकळी वनारसी मार्गावर नाकाबंदी करून सापळा रचला. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता, त्यात एमडीचा मोठा साठा मिळून आला.
दोन तरुण तस्कर अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत: १. अब्दुल फहीम (वय २५, रा. आझाद नगर, अमरावती) २. शेख आयान शेख रमजान (वय २०, रा. द्वारका नगर, अमरावती)
युवकांमध्ये पसरणारे जाळे उद्ध्वस्त
करण्याचा प्रयत्न जप्त करण्यात आलेल्या एमडीचा वापर प्रामुख्याने तरुणांमध्ये 'पार्टी ड्रग्ज' म्हणून केला जातो. हे ड्रग्ज शहरात कोणाकडे पोहोचवायचे होते आणि या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा उलगडा होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
यांच्या नेतृत्वात झाली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे व रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, अमोल कडू, वाकोडे, अतुल संभे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.