

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात दोन अवैध सावकारांच्या घरी सहकार विभागाच्या पथकाने धाड टाकून आवश्यक कागदपत्र जप्त केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मोर्शी येथील अप्पर वर्धा कॉर्टर परिसरातील दोन महिला सावकारांच्या घरी ही कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी (दि.10) दुपारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कार्यवाही केली. कोरे चेक, शेती व घरातील कागदपत्र, सातबारा सह इतर कागदपत्र येथून जप्त करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या निर्देशानुसार पथक क्रमांक एक प्रमुख स्वाती गुडधे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, सुष्मिता सुपले, राहुल पुरी यांच्यासह पथक क्रमांक दोन मधील प्रीती धामणे, अविनाश महल्ले, नंदकिशोर दहीकर, सुनील पंडागळे, किशोर भुस्कडे यांनी ही कारवाई केली. पंच म्हणून रजत पाटील, मोहित आढाव, सोमेश्वर राऊत ,अक्षय गायकी व मोर्शी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार ही कारवाई करण्यात आली.