

अमरावती: चिखलदरा तालुक्यातील आडनदी घाट परिसरात रविवारी (दि. १४) दुपारी ३.३० वाजता भीषण अपघात झाला. उतारावर उभी असलेली ट्रॅम्पो ट्रॅव्हलर अचानक पुढे सरकल्याने चालक वाहनाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील चार महिला किरकोळ जखमी आहेत.
मृत चालकाचे नाव सुमित बनकर (वय ३५, रा. चंद्रपूर) असे आहे. जखमी महिलांमध्ये वैशाली चहांदे, वैशाली दुधगवली, मधू पांडे व जयश्री उंदीरवाले (सर्व रा. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील २२ महिला ट्रॅम्पो ट्रॅव्हलर (क्र. डीडी ०३ / टी ९०४८) ने चिखलदरा येथे पर्यटनासाठी आल्या होत्या.
रविवारी परतीच्या प्रवासादरम्यान आडनदी गावाजवळील उतारावर काही वेळासाठी वाहन थांबविण्यात आले. त्यावेळी १७ ते १८ महिला वाहनातून खाली उतरल्या असतानाच अचानक ट्रॅव्हलर पुढे सरकू लागली. हे लक्षात येताच चालक सुमित बनकर यांनी वाहनासमोर उभे राहून ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनाच्या चाकाखाली दबल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या चार महिलांवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, ट्रॅव्हलरमधील उर्वरित सर्व २२ महिलांसाठी दुसर्या वाहनाची व्यवस्था करून त्यांना सुरक्षितपणे चंद्रपूरकडे रवाना करण्यात आले.