

अमरावती : शेतातील कामे आटोपून घराकडे परतणाऱ्या मजुरांना भरधाव हायड्रा वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शनिवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास यावली ते अडगाव मार्गावर घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
राजेश बारस्कर, दिना चव्हाण आणि कारू बारस्कर अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यातील बक्का चिकनी येथील रहिवासी होते. तर या अपघातात राजू गुंड बारसे (वय ४०) आणि पिंटू चंदन चव्हाण (वय २८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दिवसभराचे शेतातील काम संपवून हे मजूर घराकडे परतत असताना 'एमएच २७, बीबी ५८९२' क्रमांकाच्या हायड्रा वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिघांचा जागीच अंत झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर हायड्रा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच माहुली जहागीर पोलीस ठाण्याचे एपीआय दुर्गेश राजपूत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती संबंधितांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, माहुली जहागीर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.