Amravati Accident : मेळघाटात भीषण दुर्घटना : वीजखांब कोसळून शेतकरी दाम्पत्यासह दोन बैलांचा मृत्यू

Amravati Accident : मेळघाटात भीषण दुर्घटना : वीजखांब कोसळून शेतकरी दाम्पत्यासह दोन बैलांचा मृत्यू
Published on
Updated on

अमरावती : मेळघाटातील भोकरबर्डी गावात रविवारी (दि. ५) घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. रस्त्याच्या कडेला असलेला जीर्ण वीजखांब अचानक बैलगाडीवर कोसळल्याने, शेतकरी दाम्पत्य आणि त्यांच्या दोन बैलांचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मृतांमध्ये अमरसिंह बाबू जांबेकर (वय ५०) व त्यांची पत्नी मुन्नीबाई जांबेकर (वय ४५, रा. भोकरबर्डी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेले दोन्ही बैलही या दुर्घटनेत दगावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी शेतातील कामे आटोपून जांबेकर दाम्पत्य बैलगाडीतून गावाकडे परतत होते. त्यांचा मुलगा बिजेश हा काही अंतरावरून पायी मागे येत होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेला जुना व कमकुवत झालेला वीजखांब अचानक कोसळला आणि थेट बैलगाडीवर पडला. खांबातून उच्च दाबाचा विद्युतप्रवाह सुरू असल्याने, क्षणात संपूर्ण बैलगाडी करंटच्या विळख्यात सापडली.

मुलाने दाखवले प्रसंगावधान

आपल्या डोळ्यांदेखत आई-वडील आणि बैल मृत्यूशी झुंज देत असल्याचे पाहून मुलगा बिजेशने कमालीचे प्रसंगावधान राखले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने धावपळ करून प्रथम वीजपुरवठा बंद करण्याची व्यवस्था केली आणि नंतर जखमींना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्थानिक आपत्कालीन यंत्रणांनाही माहिती देण्यात आली.

रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याचा आरोप

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या जांबेकर दाम्पत्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हलगर्जीपणामुळे '१०८' रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर, धारणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना पोलिसांच्याच वाहनातून रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच दोघांचीही प्राणज्योत मालवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news