

अमरावती : शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत विद्यार्थिनीच्या प्रवेशासाठी सकारात्मक सत्यापन अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागणार्या पंचायत समिती भातकुलीतील दोन कर्मचार्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. हर्षवर्धन इंगळे (वय ४२, संतोषी माता कॉलनी, अमरावती) व प्रभारी केंद्र प्रमुख नरेंद्र धनस्कर (वय ५४, बापू कॉलनी, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, तक्रारदारांनी आपल्या मुलीच्या पहिलीच्या प्रवेशासाठी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरटीई अंतर्गत ऑनलाइन अर्ज केला होता. लॉटरी पद्धतीद्वारे विद्यार्थिनीला कठोरा येथील ‘टोमोए प्रायमरी इंग्लिश स्कूल’मध्ये प्रवेशासाठी निवडण्यात आले होते. ३० एप्रिल २०२६ रोजी पत्त्याच्या पडताळणीसाठी पंचायत समिती भातकुली येथून हर्षवर्धन इंगळे व प्रभारी केंद्र प्रमुख नरेंद्र धनस्कर तक्रारदारांच्या घरी गेले. यावेळी तक्रारदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचा दावा करत विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द होऊ शकतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर सकारात्मक सत्यापन अहवाल पाठविण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानुसार ७ मे रोजी एसीबीने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शविली. पंचांसमक्ष हर्षवर्धन इंगळे यांनी ५० हजार रुपये स्वीकारले. यात २५ हजार रुपये खरे नोटा तर २५ हजार रुपये डमी नोटांचा समावेश होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.