यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. माकडांनी एका महिलेची पर्स हिसकावून बंधाऱ्यात फेकून दिल्याची फुलसावंगी येथील हिंगणी येथे घटना घडली आहे. तेथे असलेल्या काही मच्छीमारांनी तत्काळ धाव घेत 14 हजारांची रक्कम पाण्यातून काढत महिलेला दिली. मात्र माकडांच्या या उपद्रवाचा या महिलेला चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागला आहे.
हिंगणी फाट्यावरून कान्होपात्रा संतोष मस्के (वय.30) ही महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत पायदळी जात होती. कोल्हापुरी बंधाऱ्यावर चार माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला केला. यावेळी कान्होपात्रा यांच्या हातातील पर्स माकडांनी हिसकावून घेतली. त्यात काही खाण्याचे सामान असैल असे समजून ती पर्स घेऊन माकडे बंधाऱ्याच्या भिंतीवर जाऊन बसले. त्यानंतर त्यांनी पर्समधील सामान अस्ताव्यस्त करीत पाण्यात फेकून दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भांबावलेली अवस्थेत बसल्या होत्या. बंधाऱ्याजवळून जाणाऱ्या काहींनी महिलेला विचारपूस केली. तेव्हा माकडाने पळवलेल्या पर्समध्ये 35 हजार रुपये रोख आणि एक तोळे सोन्याची पोत असल्याचे सांगितले. तसेच पैसे आणि दागिना माकडाने बंधाऱ्यात टाकल्याची माहिती सांगितली.
यावर ग्रामस्थांनी जवळच मासोळ्या पकडत असलेल्या भोई बांधवांकडे जाऊन त्यांना ही माहिती दिली. भोई बांधवांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन 14 हजार रुपये पाण्यातून काढून दिले. मात्र उर्वरित २१ हजार रुपये आणि एक तोळ्याची पोत मात्र त्यांना सापडली नाही. या कोल्हापुरी बंधाऱ्यावर नेहमीच या माकडांचा उपद्रव सुरू असतो. रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांच्या हातातील साहित्य ते हिसकावून घेतात. यापूर्वीही अशा घटना येथे घडल्या आहेत. विशेष म्हणजे फुलसावंगी ते हिंगणी हा दोनकिमी पाणंद रस्ता असून या रस्त्याने शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शेतकरी, नागरिक रोज ये-जा करीत असतात. या उपद्रवी माकडांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.