Amravati News: नाचोना येथील ‘त्या’ खूनशी युवकाने चिरडलेल्या ६ जणांमध्ये काकुचाही बळी

Amravati News: नाचोना येथील ‘त्या’ खूनशी युवकाने चिरडलेल्या ६ जणांमध्ये काकुचाही बळी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथे क्षुल्लक कारणावरून एका खुनशी युवकाने सहा जणांना चिरडल्याने तिघांचा बळी गेल्याची घटना मंगळवारी (दि.१९) घडली होती. या तिघांमध्ये त्या आरोपीच्या काकूचाही समावेश आहे. Amravati News

गावात अवैध दारूचा व्यवसाय करणारा चंदन राधेश्याम गुजर याचे गावातील अनेकांसोबत वैर होते. त्यामुळे त्याच्या विरोधात अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही होत होत्या. अशातच त्याच्या घराच्या शेजारीच राहणारे अंभोरे कुटुंब आपल्या अवैध दारूच्या व्यवसायाची माहिती पोलिसांना देत असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयातूनच त्याने अनेकदा अंभोरे कुटुंबाला संपविण्याची धमकीही दिली होती. सुडाची भावना त्या खूनशी युवकामध्ये बळावल्यामुळे त्याने अखेर 'कुत्र्याने कोंबडी का खाल्ली, या क्षुल्लक कारणावरून शेजारील अंभोरे कुटुंबीयासोबत मंगळवारी वाद घातला. आणि या वादातच त्याने सहा जणांना चिरडले. Amravati News

त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. त्या तिघांमध्ये आरोपीची काकू अनारकली गुजर यांचाही समावेश आहे. अंभोरे कुटुंबियांच्या शेजारीच राहणाऱ्या अनारकली गुजर यादेखील घटनेच्या दिवशी अंगणातच बसल्या होत्या. शेजारीच राहत असल्यामुळे अनारकली गुजर यांचे अंभोरे कुटुंबीयांसोबत सलोख्याचे संबंध होते.

मंगळवारी रात्री आरोपी चंदनने अनुसया श्यामराव अंभोरे (वय ६५), श्यामराव लालूजी अंभोरे (वय ७०) यांना कारने चिरडल्यावर कार पुन्हा वळवत या जखमींना सावरण्यासाठी धावलेल्या अंभोरे कुटुंबीयांवर वाहन चढविले. मात्र, यावेळी त्याची काकू अनारकली या देखील त्या कारखाली आल्याने चिरडल्या गेल्या. आरोपीच्या मनामध्ये असलेल्या सुडाच्या भावनेने त्याने अंभोरे कुटुंबातील दोघांसह त्याच्या काकू अनारकली गुजर यांचाही बळी घेतला. या घटनेत आरोपीने लक्ष केलेल्या अंभोरे कुटुंबीयातील श्यामराव यांचा मोठा मुलगा उमेश अंभोरे (वय ४२) व त्याची पत्नी शारदा अंभोरे (वय ३६) यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेला मुलगा किशोर अंभोरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंदन गुजर व त्याचे वडील राधेश्याम गुजर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना बुधवारी अटक केली आहे.

Amravati News  : पोलिसांवरच प्रश्नचिन्ह

अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून आरोपीने हे कृत्य केले. त्यामुळे खल्लार पोलिसांना आरोपीच्या अवैध व्यवसायाची माहिती होती. त्याच्याबाबत यापूर्वी दिलेल्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत संबंधित ठाण्याच्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. योग्य वेळी जर कारवाई झाली असती, तर तिघांचा बळी गेला नसता, असे ग्रामस्थांचे मत आहे.

चौकशीनंतर कारवाई

दरम्यान, आरोपीचा अवैध दारूचा धंदा होता. याबाबत खल्लार पोलिसांकडे तक्रारी होत होत्या. मात्र पोलिसांनी कारवाईच केली नसल्याचा आरोप होत असल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सखोल चौकशीनंतर योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच आरोपीचे जुने काही क्राईम रेकॉर्ड आहे का, हे देखील पोलीस तपासत असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news