

अमरावती : अमरावतीत नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात कामगारांना विषबाधा झाली आहे. जवळपास १०० महिला कामगारांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील हा प्रकार आहे. विषबाधा झालेल्या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कंपनीतील पिण्याचे पाणी अथवा तेथील नाश्ता मधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
रविवारी (दि.१२) सकाळी कंपनीतील पाणी पिल्यानंतर काही मजुरांना मळमळ व्हायला लागले, तसेच पोटातही दुखायला लागले. तर काहींना उलटी देखील झाली. काही महिला कामगारांनी सकाळी नाश्ता केल्यावर त्यांची अचानक प्रकृती बिघडली. कारखान्यामध्ये एकूण सातशे महिला कामगार कार्यरत आहे. गोल्डन फायबर ही कंपनी कापड उद्योगाशी निगडित आहे.
दरम्यान कंपनीमध्ये कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंपनीमध्ये धाव घेतली होती. गोल्डन फायबर कंपनीतील व्यवस्थापन विषबाधा झालेल्या महिला कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्यांना घरी जाण्याचे सांगत होते, असा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.