

अमरावतीः मेळघाटातील झिल्पी गावात रामसिंग रामचंद्र मावसकर (वय २८) हा तरुण १३ जुलै रोजी जनावरे घेऊन जंगलातून अकोटकडे जात होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता होता. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी (दि.२५) त्याचा मृतदेह बारुखेडा गावाजवळच्या जंगलात सापडला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता वाघाच्या हल्ल्यातच रामसिंगचा मृत्यू झाला, असे दिसून येत आहे.
रामसिंगच्या बेपत्ता असण्याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि वनविभागाने मिळून शोध सुरू केला. सलग १२ दिवस जंगलात शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला. रामसिंगसोबत असलेल्या दुसर्या युवकाने कपडे आणि टॉर्चवरून मृतदेहाची ओळख पटवली.
ही माहिती आमदार केवलराम काळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांशी बोलून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे सांगितले. तसेच, अशा घटना टाळण्यासाठी जंगल परिसरात योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी जंगलात जाताना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वनविभागाकडून जंगलात गस्त वाढवण्यात आली आहे. मागील काही कालखंडापासून धारणी मेळघाट परिसरात मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे.