
अमरावती : आज आम्ही आमचे संकल्प पत्र जारी केले आहे. महाविकास आघाडीचे सर्व आश्वासन केवळ मत प्राप्तीसाठी असतात.याउलट नरेंद्र मोदी यांचे आश्वासन दगडावरील रेख असते. आतापर्यंत मोदीजी जे बोलले, ते त्यांनी पूर्ण केले. कलम 370, राम मंदिर, ट्रिपल तलाक,सीएए ही सर्व त्याची उदाहरणे आहेत. वक्फ बोर्ड संदर्भातही लवकरच निर्णय होईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी अमरावती येथील मोर्शी विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि.१०) प्रचार सभेत केले.
मोदीजींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दहा वर्षात १० लाख १५ हजार ३०० कोटी रुपये पाठविले आहे.संपूर्ण राज्यात आमची आणि राष्ट्रवादीची युती आहे.मात्र केवळ मोर्शीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते आहे.त्यामुळे येथे घड्याळ नाही तर कमळ निवडून आणा,असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमूहाला केले.
रविवारी केंद्रीय गृहमंत्री आता भाजप नेते अमित शाह यांची मोर्शी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी मोर्शी चे उमेदवार उमेश यावलकर आणि अचलपूरचे उमेदवार प्रवीण तायडे यांना विजयी करण्याचे आवाहन जनसमुहाला केले. वेळेअभावी आपण जास्त काही बोलणार नाही असे सांगत काही मिनिटातच अमित शहा यांनी आपले भाषण आटोपते घेतले. तुम्ही मोर्शी येथील उमेदवार उमेश यावलकर यांना विजयी करा मी त्यांच्या विजयी मिरवणुकीत नक्की येईल,असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.(Maharashtra assembly poll)
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे दोनही उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने येथे उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे दोघांमध्ये येथे मैत्रीपूर्ण लढत होते आहे. तर या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.