अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मर जळाले, रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उपचार | पुढारी

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मर जळाले, रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उपचार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इर्विन येथील ट्रान्सफॉर्मर सोमवारी (दि.२५) सायंकाळी अचानक जळाल्यामुळे रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रुग्णालयातील सर्वच विभागात काळोख पसरला असून रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग लागल्यानंतर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले होते. या घटनेमुळे आयसीयूसह बालरोग विभाग, बाह्य रुग्ण विभाग तसेच इतर सर्वच वार्डातील रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदडे यावेळी रुग्णालयात हजर होते. त्यांनी तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रुग्णालयातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. आपत्कालीन स्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रुग्णालयात असलेले जनरेटर देखील बंद असल्याचे समजले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेमुळे आणि रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.

Back to top button