राजकारण सोडू, पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही : माजी खासदार आनंदराव अडसूळ | पुढारी

राजकारण सोडू, पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही : माजी खासदार आनंदराव अडसूळ

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे. त्यामुळे आमचा या जागेवर अधिकार असून आम्ही येथून लढणारच असा निर्धार शिंदे गटामध्ये असलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शनिवारी (दि.२) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार आणि त्या अमरावतीमधून कमळ चिन्हावर लोकसभा लढविणार अशी चर्चा आहे. यासंदर्भात अडसूळ यांना विचारणा केली असता त्यांनी, आम्ही या जागेवरील तरीही आमचा क्लेम सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढणारच. आठ वेळा ही जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. नवनीत राणा भाजपमध्ये गेल्यास आणि त्यांना भाजपने तिकीट दिल्यास एक वेळ राजकारण सोडू पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी ही जागा नवनीत राणा यांच्यासाठी भाजपकडून तथा एनडीएचा घटक म्हणून सोडली जाणार आहे असा दावा केला होता. नवनीत राणांच्या प्रचाराला आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ येतील असेही ते म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना आनंदराव अडसूळ म्हणाले की, राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे. तशी सवय आम्हाला नाही. ही जागा भाजपची कधीच नव्हती. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या तरी देखील आम्ही या जागेवरून आमचा दावा सोडणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. सुनावणी पूर्ण झाली असून दोन आठवड्यात निकाल जाहीर करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. यावर बोलताना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या बाजूनेच निकाल येईल असा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागेल असे ते म्हणाले. एन डी ए चे घटक पक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारसह भाजपमधील मंडळींचा देखील नवनीत राणांच्या उमेदवारीला अमरावतीमध्ये विरोध असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

Back to top button