अमरावती : सीआरपीएफ जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू | पुढारी

अमरावती : सीआरपीएफ जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अंजनगाव सुर्जी येथे घरी निघालेल्या एका सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १०) घडली. सागर विश्वासराव माकोडे असे या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. यवतमाळ येथे सीआरपीएफ चमुच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सलामी देऊन त्यांच्याववर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असलेले सागर विश्वासराव माकोडे (दि. 26 वर्ष) हे बालाघाट येथे 7 बटालियन मध्ये सीआरपीएफ मध्ये सेवेवर कार्यरत होता. ते शनिवारी रात्री सेवेवरुन घरी आले होते. दरम्यान परतवाडा येथून अंजनगाव येथे घरी येण्यास गाडी उपलब्ध नसल्यामुळे त्याने त्याचा मित्र नंदकिशोर दातीर ह्याला परतवाडा येथे मोटरसायकल घेऊन बोलावले होते. परतवाडा येथून त्यांच्या मित्राच्या गाडीवरुन घरी येत असताना रात्री 12 वाजताच्या दरम्यान गावानजीकच्या पारीख पेट्रोल पंपाजावळ अपघात झाला.  डीव्हायडरवर त्यांची दुचाकी आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जवान सागर माकोडे ह्यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सोबत असलेले मित्र नंदकिशोर दातीर हे जखमी झाले. दातीर यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृत सागर माकोडे ह्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर अंजनगाव स्मशानभूमीत यवतमाळ येथील सीआरपीएफ चमुच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय होता.

माकोडे चार महिन्यापूर्वीच रुजू

सागर हे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करुन चार महिन्यापूर्वीच सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई-वडील हे मजुरीचे काम करतात. मोठा भाऊ पुणे येथे कंपनीत असून, सर्वात लहान भाऊ हा सुद्धा नुकताच चार महिन्यापूर्वीच आसाम येथे बीएसएफ मध्ये रुजू झाला आहे. तिनही मुलं नोकरीला लागल्यामुळे आता कुठे परिस्थिती सुधारेल या विचारात आई, वडील असतांना अचानक सागरवर काळाने घाला घातला. सागरच्या अकाली जाण्याने त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button