अमरावती; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनव्दारा आयोजित 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. घोंगडी, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदूबाई शिंदे, राजमाता अहिल्या देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, सुरेखा ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यपाल बैस पुढे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या काळापासून भारताने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठे बदल पाहिले आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा द्रष्ट्यांना जन्म देण्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले, ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा भक्कम पाया रचला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. अहिल्यादेवींनी भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि विविध ठिकाणी मंदिरे बांधलीत. लोकांच्या सुविधेसाठी रस्ते, घाट, विहिरी आणि पायऱ्या बांधल्यात. भुकेल्यांसाठी भोजन सत्र व तहानलेल्यांसाठी आसन व्यवस्था सुध्दा त्यांनी केली. ज्या महिलांनी कुठल्याही अडचणींना न जुमानता स्वत:चे एक स्थान निर्माण केले आणि उत्कृष्ट कार्य केले, अशा महिलांना अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही राज्यपाल बैस म्हणाले.
भारतातील स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये 50 टक्के महिला सदस्य असताना, भारताच्या संसदेने अलीकडेच महिला आरक्षण विधेयक लागू केले आहे जे कायदे आणि निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन देते. यावर्षीच्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत 10 टॉपर्सपैकी सहा महिला आहेत. प्रशासनात तसेच वरिष्ठ पोलीस पदांवर पूर्वीपेक्षा जास्त महिला आहेत. येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार महिलांकडे राहील, असेही राज्यपालांनी सांगितले.
समाजातील सर्व मुली आणि मुलांसाठी आनंदी आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी खूप कार्य करावे लागणार असून स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, महिलांवरील गुन्हे यासारख्या सामाजिक दुष्कृत्ये अस्तित्वात आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सुरक्षित राष्ट्राची ओळख तेथील महिला सुरक्षेच्या कार्यातून केली जाते, असेही राज्यपाल म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्याच्या फाऊंडेशनच्या कार्याचा यावेळी गौरव केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, कर्तृत्व दाखविण्याची संधी प्रत्येकाला मिळते. परंतू त्या संधीचे सोने करण्याची गरज असते. विविध क्षेत्रातल्या महिलांनी संधीचे सोने केल्याचे आज या पुरस्कार सोहळ्यात दिसून येत आहे. अनेक वर्षापासून अशा महिलांना पुरस्कार देवून गौरवल्यामुळे त्याद्वारे समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले. महिलांच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊलं उचलले असल्याचे सांगून पवार म्हणाले की, शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योजना राबवित असते. त्याचा लाभ तळागळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी करीत असतात. सर्वांच्या सहयोगातून आपण यापुढेही काम करीत राहू असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमात सन्मानार्थी पाचही महिलांच्या संघर्षाची व कार्यकर्तृत्वाची चित्रफीत दाखविण्यात आली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, गायिका वैशाली माडे यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी खासदार डॉ. विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विशद केली.