

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेत नोकरी लावून देण्याची बतावणी करून तब्बल 17 तरुणांची 1 कोटी 56 लाखांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत (दि.१५) उघडकीस आली. या घटनेची तक्रार मंगेश वसंतराव हेंड (३८, रा. रामटेकपुरा, अकोट, जि. अकोला) यांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार (४५, रा. अंजनगाव सुर्जी), श्रीकांत बाबुराव फुलसावंदे (रा. राजुरा, ता. जि. अमरावती), विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा) व मोन्टी ऊर्फ मेघराजसिंग चव्हाण (ठाकुर) (रा. मसानगंज, अमरावती) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये अंजनागवातील शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षाचा देखील समावेश आहे.
मंगेश हेंड यांच्या तक्रारीनुसार, मंगेश यांची डिसेंबर २०२१ मध्ये योगेश इसोकारसोबत ओळख झाली. त्यावेळी त्याने सांगितले की, मी शिवसेना शिंदे गटाचा शहर प्रमुख आहे. मुन्ना इसोकार यांची व माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासोबत चांगली ओळख असून तुला रेल्वे डिपार्टमेंटला नोकरीवर लावून देतो, परंतू त्याकरिता तुला पैसे खर्च करावे लागतील, सोबत एकूण दहा ते पंधरा कँडिडेट्स लागतील, प्रत्येकाला दहा लक्ष रुपये खर्च येणार आहे. तो तुम्हाला खर्च करावा लागेल,अशी बतावणी फिर्याादी सोबत केली. त्यानुसार मंगेशने आकोट येथील त्याचे काही नातेवाईक व इतर मित्र परिवारातील लोकांना याबाबत सांगितले व त्यानुसार मुन्ना इसोकार यांच्यासोबत व्यवहार सुरू झाला. इसोकार यांच्या सांगण्यानुसार परतवाडा येथील गोवर्धन जाधव यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना पैसे दिले तसेच श्रीकांत फुलसावंदे (रा.राजुरा) यांच्यासोबत संपर्क साधून काही रक्कम यांच्याकडे देण्यात आली. तसेच महिंद्रा कोटक, त्रिमूर्ती नगर नागपूर येथील बँक खात्यात आरटीजीएस द्वारे रक्कम जमा केली.
मात्र बराच काळ उलटूनही तरुणांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नाही. तसेच दिलेले पैसेही परत देण्यास आरोपींनी नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी अंजनगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पुढील तपास पोलीस करत आहे.