

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: एका तेरा वर्षीय मुलाचे हातपाय बांधून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार अमरावतीत बसस्थानक मार्गावरील एका मदरशात उघडकीस आला. या घटनेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी मौलाना सलमान मुफ्ती (वय ३८, न्यू इस्लामपुरा, बिच्छू टेकडी) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
अधिक माहितीनुसार, मदरशातील मौलाना सलमान मुफ्ती (वय ३८, न्यू इस्लामपुरा, बिच्छू टेकडी) याने २ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तेरा वर्षीय मुलाला आपल्या खोलीत बोलावले आणि त्याने आरडाओरड करू नये किंवा पळून जाऊ नये, म्हणून त्याचे हात पाय दुपट्ट्याने बांधले, तोंडात रुमालही कोंबला. त्यानंतर मौलाना सलमान मुफ्तीने आपल्या मोबाईलवर अश्लील अनैसर्गिक कृत्यांचे व्हिडिओ दाखवले आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत मुलाच्या वडिलांकडून तक्रार मिळताच कोतवाली पोलिसांनी नेर येथून मौलाना सलमान मुफ्तीला अटक करून अमरावतीत आणले. त्याची चौकशी केली जात आहे. मौलाना सलमान मुफ्ती याने तेरा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला आणि हा प्रकार कुणाला सांगू नको, शांतपणे खोलीत जाऊन झोप, अशा सुचना केल्या. त्यामुळे रात्रभर त्या मुलाला वेदना जाणवल्या.
त्यानंतर त्याने दुसर्या दिवशी सकाळी मदरसा सोडून थेट आपले गाव गाठले. मुलगा अचानक गावात परतल्याचे पाहून वडिलांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने घडलेली सर्व हकिकत सांगितली. ही बाब मुलाच्या वडिलांना समजताच त्यांनी मुलासह तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठून मौलाना सलमान मुफ्ती याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे बीएनएस कलम ४ (२) व ६ (१) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८/१२ नुसार फौजदारी गुन्हा नोंदविला. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी मौलाना सलमान मुफ्ती याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो नेरमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे माहिती पडले. कोतवाली पोलिसांच्या पथकाने नेर गाठून मौलाना सलमान मुफ्ती याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्याला अमरावतीला आणले. त्याची सध्या चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे.