अमरावती : गावठी दारूने घेतला दोघांचा बळी; २ आरोपींविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अमरावती : गावठी दारूने घेतला दोघांचा बळी; २ आरोपींविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Published on
Updated on
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : गावठी दारू पिल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मोर्शी तालुक्यातील तरोडा धानोरा या बहुल आदिवासी खेड्यात ही धक्कादायक घटना बुधवारी (१९ जूलै) रात्री उघडकीस आली. जंगलु टेकाम (६२,रा.तरोडा) व मयाराम धुर्वे (६७, रा. तरोडा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणात मोर्शी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांविरुध्द सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा नोंदविला आहे.
मोर्शीपासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या तरोडा धानोरा येथे १९ जुलैच्या रात्री येथील काही पुरूष व महिला जंगलु टेकाम (६२), मयाराम धुर्वे (६७), सिताराम शेषराव परतेती (३७), सुंदा मयाराम धुर्वे (६५), सिंधु इसम धुर्वे (४५), सुमेलाल श्यामू कुमरे (४०, सर्व रा. तरोडा), सुखदेव जिवता उईके (४२, रा.धानोरा) यांनी गावठी मोहाची दारू पिली. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाली. त्यांना चक्कर व उलटी होऊ लागल्याने त्यांना मोर्शीतील उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अस्वस्थ झालेल्या पुरूष व महीलांपैकी जंगलु टेकाम वय (६२, रा.तरोडा) व मयाराम धुर्वे (६७, रा. तरोडा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. इतर अस्वस्थ रूग्णांपैकी सिताराम शेषराव परतेती, सुंदा मयाराम धुर्वे, सिंधु इसम धुर्वे, सुमेलाल शामू कुमरे व सुखदेव जीविता उईके यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालय दाखल करण्यात आले आहे. ही दारू चन्द्रकला जंगलु टेकाम हीने आणून दिली होती, तर त्यामुळे या दारूमुळे त्यांना बाधा झाली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपासात मृतक मयाराम धुर्वे याने ती दारू आणल्याची माहिती पुढे होती व सदर दारू पिल्याने प्रकृती बिघडत असल्याचे माहीत असुन सुध्दा चंद्रकला टेकाम हीने ती दारू नागरिकांना पिण्यास दिली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०४, ३२८, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. चन्द्रकला टेकाम हीला मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती, तर दुसरा आरोपी मयाराम धुर्वे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
मोर्शी लगतच काही किलोमीटर अंतरापासून मध्यप्रदेश हद्द सुरू होते. मध्यप्रदेश हद्दीत असलेल्या पहाडपट्टीचा व वाढलेल्या झाडाझुडपांचा आडोसा घेऊन अवैध हातभट्टीची गावठी दारू काढण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकवेळा मध्यप्रदेश राज्याचे सिमावर्ती जिल्ह्यातील काही भागातून गावठी हातभट्टी दारू मध्यप्रदेश येथुन मोर्शी येथील सिमेलगतच्या काही खेडयात आणली जात असल्याचे दाखल गुन्ह्यावरून निदर्शनास येते. त्याच प्रमाणे सिमेलगतच्या खेडयातून रोजगाराकरिता मजूर वर्गाची ये-जा असते, अश्यावेळी मध्यप्रदेश राज्याचे सिमेमधील एखादया खेडयातून सदर गावठी दारू पिण्यासाठी आणली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश उप-विभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांना दिले आहेत.

दारु तस्करांवर कारवाईचा सपाटा

मध्यप्रदेश पोलीस व महाराष्ट्र पोलिस पथक दारू काढणार्या परिसरात तैनात करण्यात आले असून मध्यप्रदेश येथून अवैध गावठी दारूची तस्करी करून खेड्यापाड्यात दारू पुरविणार्या राजकुमार साबळे याला सुद्धा मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारू काढणारा मुख्य सूत्रधार याचा शोध पोलिस घेत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मध्यप्रदेशातील आठनेर पोलीस, महाराष्ट्र पोलीस जिल्हास्तरावरील आरसीबी पथक दंगा नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले असून दारू काढणार्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मृतांवर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार

अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या दोन महिलांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. .20 जुलै रोजी दोन्ही मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात तरोडा येथे अंतिम संस्कार पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news