इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर एका तरुणीवर जबरीने शारिरिक संबंध प्रस्थापीत केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (16 जून) उघडकीस आला. पिडित तरुणीच्या तक्रारीनुसार, तिच्या मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवरून तिची ओळख प्रशांत पोच्छे (२८, रा. खेडपिंपरी, ता. नांदगाव खंडेश्वर) याच्यासोबत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग व फोनवर बोलणे सुरु झाले. दरम्यान जुन २०२२ मध्ये तरुणीला प्रशांतने फोन करून पंचवटी चौकात भेटायला बोलाविले. त्याने तिला दुचाकीवर बसून एका लॉजवर नेले आणि तिच्या इच्छेविरुध्द शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने तरुणीचे फोटो देखील काढले. त्यानंतर काही दिवसांनी परत प्रशांतने तरुणीला फोन करून भेटायला बोलाविले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा तिच्या इच्छेविरुध्द शारिरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने प्रशांतला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने तरुणीला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडित मुलीने प्रथम राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहणी सुध्दा केली. परंतू पिडित मुलीला घटनास्थळ लक्षात आले नाही. त्यानंतर पिडित मुलीने गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत पोचछेविरुध्द गुन्हा नोंदविला.