

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड व दहिखेड फुटकळ व केलपाणी या आदिवाशी भागातील शेतशिवारात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. आतापर्यंत तीन वेळा या वाघाने जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे या भागात वाघाबद्दल दहशत निर्माण झाली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी, २८ नोव्हेंबरला बोकड व बकरीच्या पिल्लावर हल्ला चढवित त्यांचा फडशा वाघाने पाडल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी यांच्यात भीती व्यक्त होत आहे. वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी देखील शेत शिवारात राहुटीवर वाघाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात दुधाळ जनावरे असून दुग्ध व्यवसाय शेतकरी करत आहेत. शेत शिवारात पिकांमध्ये मशागतीची कामे कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे या भागातील मुक्त संचार असलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.