

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर नवसाळ फाट्यानजीक सोयाबीनचे गट्टू घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीमध्ये ट्रकसह २३ लाखांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. हा ट्रक अमरावती कडून नाशिक करिता जात होता .
प्राप्त माहितीनुसार ,ट्रक क्र. एमएच १८ एए ९६४३ हा टाकररखेडा संभू येथून सोयाबीनच्या गट्टूचा माल भरून नाशिककडे निघाला होता. गुरुवारी रात्री ३ वाजेदरम्यान इंजिनकडून अचानक आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे , उपनिरीक्षक गणेश महाजन व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचवून राष्ट्रीय महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. यावेळी आग विझविण्यासाठी मूर्तिजापूर मनपा अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले होते. या घटनेत २३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.