

अकोला : मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार व स्वीपच्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अंतर्गत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या आवाहनानुसार मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. शहरातील मान्यवर डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित राहून उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नोडल अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी सर्व डॉक्टर मंडळींनी आपल्या रुग्णालयात दर्शनी भागात पोस्टर लावून तसेच, आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करण्यासाठी आवाहन केले. या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही असोसिएशनच्या प्रतिनिधींनी दिली. यावेळी दिव्यांग युथ आयकॉन अस्मिता मिश्रा या उपस्थित होत्या. श्रीमती वैष्णव यांच्या हस्ते जागृती पोस्टरचे अनावरण यावेळी झाले. श्याम राऊत, गोपाळ सुरे, विकास राठोड व . सुरेश पोते आदी उपस्थित होते.