

अकोला : अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आला. अकोट शहरातील एका २६ वर्षीय युवकाने धरणामध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली होती. हा मृतदेह त्याचाच असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 15 ऑक्टोबरला घडली. श्रीकांत मधुकर राजपुरे (वय २६ रा. रामदेवनगर, अकोट) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाचे पांडुरंग तायडे यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला कळविले. त्यानंतर, शोधकार्य सुरू केले. पहिल्या दिवशी या युवकाचा शोध लागला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्या युवकाचा मृतदेह ग्रामस्थांना पाण्यात तरंगताना दिसला. यानंतर एकलव्य बचाव पथकाच्या चमूच्या साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.