

अकोला : जिल्ह्यात मंगळवारी (दि.२३) रात्री दमदार पावसाची एन्ट्री झाली. अकोला शहरात रात्री 1 वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. अकोट शहरात जोरदार पाऊस आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. जिल्ह्यात पहिला कमी जास्त प्रमाणात सार्वत्रिक पाऊस झाल्याने उकाड्यापासून सुटका झाली तर शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत .
अकोट शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. पहिल्याच पावसात नालेसफाई मोहिमेची पोलखोल झाली असून, जागोजागी नाल्या तुंबल्या. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी तसेच गजानन नगर परिसरातील काही भागांमध्ये नाल्यांमधील पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले.
अचानक घरात पाणी घुसल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली . घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे नागरिक सांगत आहेत. जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शीटाकळी, अकोट, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर तालुक्यात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान पाऊस झाल्याने अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.