

अकोला : तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील पुरुषोत्तम रामचंद्र लासुरकार ( वय 50) हे पत्नीसह दुचाकीने घराकडे 17 मार्चरोजी येत असताना दहिगाव फाट्या जवळ रानडुकराची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना गंभीर अवस्थेत अकोला व तेथून नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु शनिवारी (दि. 21) त्यांचे निधन झाले.
प्राप्त माहिती नुसार, तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील पुरुषोत्तम लासुरकार हे त्यांच्या पत्नीसह17 मार्च रोजी अंदुरा येथे कार्यक्रमाकरिता गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर रात्री नऊच्या दरम्यान घरी परत येताना पंचगव्हाण ते दहिगाव फाट्यादरम्यान त्यांच्या दुचाकीच्या समोर रानडुक्कर आडवे आले. रानडुकराच्या धडकेमुळे दुचाकीसह हे पती-पत्नी रस्त्यावर पडले. पत्नीस किरकोळ जखमा झाल्या, मात्र पुरुषोत्तम लासुरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
गंभीर अवस्थेत त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात व तेथून नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान सकाळच्या सुमारास तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 21 मार्च रोजी दहिगाव येथे त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.