

अकोला - हिवरखेड येथे शनिवारी दुपारी जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनचे नुकसान झाले. पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीचे टीन पत्रे उडून गेले आहेत. मालखाण्यात पाणी शिरले तर कॉम्प्युटरच्या वायरिंग जळाल्या, इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.
हिवरखेड येथील अनेक पोलीस स्टेशनची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. या अवस्थेतच पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना कर्तव्य बजावे लागत आहे. परंतु अनेक वर्षांपासून नागरिकांची आणि पोलिसांची मागणी असूनही पोलीस स्टेशनची आणि पोलीस वसाहतीची नवीन इमारत अजून पर्यंत उभारल्या गेली नाही. त्यामुळे नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा जीव सुरक्षित नसल्याचे बोलले जाते .
दरम्यान वादळी वारा आणि पाऊस या मुळे उडालेले पत्रे गोळा करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली शेवटी गृहरक्षकांनी व पोलिस स्टेनच्या आजुबाजूच्या नागरिकांनी त्यांना सहकार्य केले .
दुपारच्या पावसात हिवरखेड परिसरात दोन ठिकाणी वीज पडली सुदैवाने जिवीतहानी टळली आहे अशी माहिती आहे. तसेच एका ठिकाणी ध्वजारोहनाचा उंच लांब खांब कोसळला आहे, झाडे झुडपे उन्मळून पडली . तसेच या परिसरातील नाल्यांना पूर आल्याने काही काळ अकोट हिवरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प होती.