

अकोला - अकोट आगाराची एस टी बस अकोट ते शहानूर व पोपटखेड मार्गाने अकोट करिता येत असतांना अचानक धूर निघून एस टी बस ने पेट घेतला. ही घटना आज 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने एस टी बस मधील प्रवाशी चालकाच्या समयसूचकतेमुळे सुखरूप बचावले .
अकोट आगाराची एस टी बस क्र एम एच 40 एन - 9893 ही शहानूर कडून पोपटखेड मार्गे अकोट येत होती. रस्त्याने जात असताना बसमधुन अचानक धूर निघून पेट घेतला. चालकाच्या सतर्कतेमुळे धूर निघताच रस्त्याच्या कडेला बस उभी करून प्रवाशी व वाहक यांना बाहेर काढण्यात आले. या वेळी केवळ तीनच प्रवाशी बस मध्ये होते. काही वेळातच बस जळून खाक झाली. दरम्यान घटनेची माहिती होताच अकोट ग्रामीण पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे कारण कळू शकले नाही.