

Akola Police Constable Arrested
अकोला : अकोला पोलीस दलाला मान खाली घालायला लावणारी घटना घडली आहे. एका कर्मचाऱ्याने पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सचिन गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अकोला पोलीस दलात चालक (MT विभाग) म्हणून कार्यरत असलेल्या सचिन गायकवाड यांने पोलीस भरतीच प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होती.
यादरम्यान आरोपी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक शोषण केले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने अकोला पोलीस दलात खळबळ उडाली आहे.