

अकोला : अकोट नगर परिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी झालेल्या 'अकोट नगर विकास मंच'मधील भाजप आणि एमआयएम यांच्या कथित युतीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाला आता अनपेक्षित कलाटणी मिळाली असून, भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट आमदारांनाच नोटीस बजावल्याने आणि MIM ने पाठिंबा मागे घेतल्याने अकोटचे राजकारण तापले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्या नावे एक खरमरीत पत्र प्रसिद्ध केले आहे. ‘एमआयएमसोबत युती करून पक्षाच्या ध्येय-धोरणांना सुरुंग लावला आहे,’ अशा शब्दांत प्रदेशाध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोणालाही विश्वासात न घेता केलेल्या या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून, 'तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?' असा थेट सवाल या पत्रातून विचारण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या स्थानिक गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, एमआयएम पक्षानेही सावध पवित्रा घेत 'अकोट नगर विकास मंच'ला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले आहे. तसे प्रसिद्धी पत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपसोबत जाण्याच्या चर्चेमुळे स्वतःच्या मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी MIM ने ही माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
२०२५ च्या अकोट नगर परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी 'अकोट नगर विकास मंच'ची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे ११ नगरसेवक आणि MIM चे ५ नगरसेवक यांसह इतर पक्षांना एकत्र घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजप आणि एमआयएम एकाच मंचावर आल्याने राज्यभर चर्चेला उधाण आले होते. आता दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरणे आणि माघार घेण्याचे सत्र सुरू झाल्याने या 'विचित्र' युतीचा फुगा फुटल्याचे चित्र दिसत आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या पत्रावर आमदार प्रकाश भारसाखळे आता काय उत्तर देतात आणि आपली भूमिका कशी स्पष्ट करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे अकोट नगर परिषदेत सत्तास्थापनेचे समीकरण पुन्हा एकदा गुंतागुंतीचे झाले आहे.