Akola News : अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू? ‘अगर वेस’ भागात मालवाहू ऑटोमध्ये आढळला चालकाचा मृतदेह

Akola heatstroke death : अकोला जगातील उष्ण शहरांच्या यादीत
Akola News : अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू? ‘अगर वेस’ भागात मालवाहू ऑटोमध्ये आढळला चालकाचा मृतदेह
Published on
Updated on

अकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोला शहर आणि जिल्ह्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, या भीषण उष्णतेचा पहिला बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज, १५ एप्रिल रोजी जुने शहर परिसरातील अगर वेस भागात एका मालवाहू ऑटोमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुने शहरातील अगर वेस भागात एक मालवाहू ऑटो उभा होता. बराच वेळ झाला तरी चालकाची कोणतीही हालचाल होत नसल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. जवळ जाऊन पाहिले असता, चालक आसनावरच मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तात्काळ जुने शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला.

पोलिसांची प्राथमिक माहिती

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा मारहाणीच्या खुणा नाहीत. त्यामुळे घातपाताची शक्यता कमी असून, वाढत्या तापमानाचा फटका बसून या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

अकोला जगातील उष्ण शहरांच्या यादीत

अकोल्यात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. काल, १४ एप्रिल रोजी अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, जागतिक तापमानाच्या नोंदीमध्येही अकोल्याच्या नावाचा समावेश झाला असून, हे शहर सध्या आगीच्या गोळ्यासारखे धगधगत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून उष्ण वारे वाहत आहेत.

प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या घटनेने अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news