

अकोला : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शुक्रवारी असलेला उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शेतकरी बांधवांच्या आग्रहाखातर कृषी मंत्र्यांनी विविध दालनांना भेटी देऊन कृषी संशोधन, प्रयोगशील आणि नव उत्पादनांची माहिती घेतली, तसेच शेतकरी, महिलाभगिनी, कृषी नवउद्योजक यांच्याशी संवाद साधला.
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आत्मा, तसेच कृषी विभागाच्या वतीने तीन दिवसीय ॲग्रोटेक राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. सर्वप्रथम कृषीमंत्री कोकाटे यांनी माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, तसेच कृषी मंत्र्यांनी देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खासदार अनुप धोत्रे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, प्र. कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखडे, विठ्ठल सरप पाटील, डॉ प्रशांत कुकडे, जनार्दन मोगल, केशवराव तायडे, श्रीमती हेमलता अंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान व प्रयोगांची माहिती पोहोचण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांप्रमाणेच प्रयोगशील शेतक-यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, कृषी तंत्रज्ञान हे प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे.
यावेळी मंत्री कोकाटे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक कक्षाला भेट देऊन शेतीतील नवीन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठाचे संशोधन, विविध प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी संशोधक, कृषी तज्ज्ञ तसेच शेतकरी बांधव, बचत गटाच्या सदस्य महिलाभगिनी, नवउद्योजक आदींशी संवाद साधून प्रयोग व नवउत्पादनांबाबत जाणून घेतले.
प्रदर्शनात कृषी जागर, कृषी निविष्ठा, पुष्पांगण, कृषी प्रक्रिया उत्पादने अशी पाच स्वतंत्र महादालने उभारण्यात आली आहेत. त्याअंतर्गत, कृषी उत्पादने, निविष्ठा, फुले, यंत्र अवजारे, महिला बचत गट अशा सुमारे अडीचशे कक्षांचा समावेश आहे. प्रदर्शनाची वेळ स. 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असून, कृषी मार्गदर्शनाबरोबरच रोजगार - स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी जाणून घेता येणार आहेत. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना शेती आणि प्रक्रिया उद्योगातील वैविध्य व नाविन्यता अनुभवता येणार आहे.