Akola Crime : गाडीच्या चावीने वार करून तरुणाला केले जखमी; मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News |
Crime News File Photo
Published on
Updated on

अकोला : मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती भागात एका ३६ वर्षीय तरुणावर गाडीच्या चावीने डोक्यावर आणि कानामागे वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १७) पहाटे घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरात राहणारे गणेश केशवराव साबळे (वय ३६) हे शनिवारी मध्यरात्रीनंतर आपल्या घरी झोपलेले होते. दरम्यान, जुनी वस्तीतीलच 'काळागोटा' परिसरात राहणारा रोहन रमाकांत पांडे (वय २६) हा गणेश साबळे यांच्या घरी आला. त्याने घराचा दरवाजा वाजवून साबळे यांना घराबाहेर बोलावले. साबळे बाहेर येताच रोहनने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या दरम्यान दोघांमधील वाद अधिकच वाढला. संतापलेल्या रोहन पांडे याने स्वतःच्या हातातील गाडीच्या चावीने गणेश साबळे यांच्या डाव्या कानाजवळ आणि डोक्यावर जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की साबळे यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर गणेश साबळे यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी साबळे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपी रोहन रमाकांत पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news