

यवतमाळ : तालुक्यातील जोडमोहा ग्रामपंचायतीकडून फवारणी केली जात आहे. मंगळवारी रात्री फवारणी सुरू असताना एका हॉटेल व्यावसायिकाने दुकानातही फवारणी कर असे सांगितले. मात्र, पंपाच्या आवाजाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला हे ऐकू आले नाही. यावरून हॉटेल व्यावसायिकाने सरपंच महिलेसोबत वाद घातला. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची तक्रार देण्यासाठी सरपंच महिला मुलाच्या दुचाकीवरून यवतमाळकडे येत असताना, हॉटेल व्यावसायिकाने खटेश्वरजवळ भरधाव कारने सरपंच असलेल्या महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्पेश शालिकराव खेकडे (रा. जोडमोहा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने मंगळवारी धूळ फवारणी करणाऱ्या लक्ष्मण लुंगसे (रा. वटबोरी), वासुदेव पांडुरंग मुरकुटे व सरपंच सुनंदा वासुदेव मुरकुटे यांच्याशी वाद घालून मारहाण केली. बुधवारी सकाळी या घटनेची तक्रार देण्यासाठी सरपंच सुनंदा मुरकुटे या मुलगा शिवम वासुदेव मुरकुटे याला घेऊन दुचाकीने यवतमाळकडे जात होत्या.
खटेश्वरजवळ त्यांच्या दुचाकीला आरोपी कल्पेश खेकडे याने भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात सुनंदा मुरकुटे व शिवम मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कल्पेश शालिक खेकडे याला ताब्यात घेतले. ठाणेदार प्रशांत कावळे, सहायक निरीक्षक प्रवीण मानकर, जमादार रणजित जाधव, गणेश घोसे, जमादार सचिन तंबाखे यांनी घटनास्थळ पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा ताब्यात घेतले आहे.