

अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध लावण्यात पोलिसांना महिनाभरानंतर यश आले आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सलग एक महिना तांत्रिक तपास आणि विविध शहरांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर तिला भंडारा येथून ताब्यात घेतले. कोणत्याही वादाशिवाय ही तरुणी सुखरूप आपल्या पालकांकडे परतल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यात माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तरुणीचा कोणताही सुगावा लागत नसल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावात चिंतेचे सावट होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले, कारण संबंधित तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण या दोघांचेही मोबाईल फोन बंद होते. मोबाईल लोकेशन मिळत नसल्याने हा तपास अधिकच कठीण झाला होता.
मात्र, पोलिसांनी हार न मानता तांत्रिक माहिती, स्थानिक खबऱ्यांचे जाळे आणि विविध ठिकाणांवरील संपर्कांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांचे एक पथक सातारा, नागपूर आणि भंडारा अशा विविध शहरांमध्ये महिनाभर सातत्याने शोध घेत होते. या मोहिमेदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, संबंधित तरुणी भंडारा येथे एका आंतरजातीय तरुणासोबत राहत आहे. या माहितीची खातरजमा होताच माना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भंडारा गाठले आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर ठाणेदारांनी आणि तपास पथकाने अत्यंत संयमाने दोघांचीही समजूत काढली. कोणत्याही प्रकारचा सामाजिक किंवा कौटुंबिक वाद निर्माण होऊ न देता हे प्रकरण शांततेत मार्गी लावण्यावर पोलिसांनी भर दिला. अखेर तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आणि संबंधित युवकालाही योग्य समज देण्यात आली. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे एका मोठ्या वादावर पडदा पडला.
ही यशस्वी कामगिरी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या शोधमोहिमेत ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवडते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या चिकाटीचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.