

अकोला : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी गेले असता आरोपीने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता, तेव्हापासूनच आरोपी फरार होता. या घटनेच्या निषेधात शुक्रवारी (दि.१२) सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोल्यात हजारोंच्या संखेत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी फरार असलेल्या आरोपी तौहीद खान समीर खान यास अकोला पोलिसांनी मध्यप्रदेश येथील इंदूर येथून अटक केली होती.
डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील कुटुंबीय ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी गेले होते. घरात अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी तौहीद खान समीर खान याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता . या घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. डाबकी रोड पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान अकोल्यात या घटने मुळे जन भावना तीव्र झाल्या होत्या. शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा ची हाक सकल हिंदू समाज बांधवांनी दिली होती. तत्पूर्वी अकोला पोलिसांनी घटनेच्या दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी ला इंदूर येथून अटक करून अकोल्यात आणले.
शुक्रवारी (दि.१२) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाज बांधवांनी हजारोंच्या संखेत मोर्च्यात सहभागी होत या घटनेचा निषेध केला. या मोर्च्याचे नेतृत्व संग्राम जगताप यांनी केले. या मोर्च्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी सामील झाले होते. यावेळी मोर्चात सहभागी असणाऱ्या महिला व नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली .
आरोपीचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांच्या पथकाने अहोरात्र प्रवास केला. विविध राज्यातील वेगवेगळ्या शहरात आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणी 250 सिसिटीवी फुटेज चेक करण्यात आले तर विविध रेल्वे गाड्यामध्ये तपासणी करण्यात आली .अखेर आरोपीला इंदौर येथून अकोला पोलिसांनी पकडले अशी माहिती आहे.