

अकोला; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीला सुरुवात झाली आहे पतंग शौकीन मोठ्या प्रमाणात पतंग उडवित आहेत. अशातच अकोट शहरात १० जानेवारीला दुचाकीने अकोला मार्गावरून जात असलेल्या युवकाचा चायनीज मांजामुळे गाल चिरल्याची घटना घडली आहे. यात युवक जखमी झाला आहे.
चायनीज मांजामुळे जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्यामुळे शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. पण अकोट शहरातील काही विक्रेते छुप्या पद्धतीने चायनीज मांजाची विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. या मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा युवकाचा गाल चिरला गेल्याची घटना १० जानेवारीच्या दुपारच्या सुमारास घडली.
महेंद्रसिंग रामसिंग ठाकूर हे दुचाकीने अकोला मार्गावरील मेडिकलमध्ये जात असताना अचानक त्यांच्या डाव्या गालाला दुखापत झाली. त्यांनी तपासून पाहिले असता लटकलेल्या चायनीज मांजाने त्यांचा गाल चिरला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ठाकूर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानंतर ते उपचारासाठी दवाखान्यात गेले.