नागपूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणूक संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सार्थक कपाडी या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईतील रहिवासी असून ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी हे आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. नागपूर पोलिस सार्थक कपाडीला अटक करणार असल्याची माहिती आहे. कपाडी याने आपल्या ट्विटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सायबर पोलिसांकडून त्याची माहिती घेतली जात आहे.
सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदी नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा प्रकार नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर आमदार कृष्णा खोपडे यांनी रविवारी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा