चंद्रपूर : हिरापूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर उचल | पुढारी

चंद्रपूर : हिरापूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर उचल

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिरापूर ग्रामपंचायत मध्ये सन २०२३ ते २४ या वित्तीय वर्षात पंधराव्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी प्राप्त झाला होता. परंतु, हा निधी काम न करताच परस्पर सरपंच, सचिव यांच्या संगनमताने पैसे उचलल्याचा प्रकार गुरुवारी (दि.23) झालेल्या ग्रासभेत उघड झाला. यामुळे ग्रामसभा वादळी ठरली. गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून निधीची वसुली करण्यात यावी, असा ठराव नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे ग्रामसभेने हा खर्च नामंजूर करून शासनाच्या निधीची काम न करता परस्पर उचल करणाऱ्या वर फौजदारी कारवाई करून, या निधीची रिकव्हरी करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पंचायत समिती वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

चिमूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत मध्ये नऊ सदस्य आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या आधारे विकास कामासाठी ग्रामपंचायतीला सन २०२३ ते २०२४ या वर्षात विकास निधी प्राप्त झाला होता. हा निधी आराखड्या नुसार खर्च करावा लागतो. मात्र, त्याला बगल देत तत्कालीन ग्रामसेवक लोकचंद भसारकर आणि तत्कालीन प्रभारी सरपंच मंगला मुनघाटे यांनी नवीन (आरो) मशीन न घेता १ लाख ४६ हजार ५०० रुपये परस्पर एजन्सी च्या खात्यात ट्रान्स्फर केले.

गावात नवीन नाले बांधकाम केलेच नाही पण नाली बांधकाम केले म्हणून पैसे दिल्याची नोंद आहे. वॉटर हार्वेस्टिंग केलेच नाही. मात्र, ९९२०० रुपयांची उचल केली. नाली उपसा,सॅनिटायझर, औषधोपचार, साहित्य खरेदी, मजूर पेमेंट अश्या अनेक बाबीवर खर्च झाला म्हणून दाखवून फक्त तीन दिवसात १३ लाख ६७ हजार १५० रुपयांची उचल केल्याचे बँक रेकार्डला नोंद आहे. ही बाब ग्रामसभेत माहित झाल्याने सर्व नागरिकांनी हा सर्व खर्च नामंजूर करून गैरप्रकार करणाऱ्या तत्कालीन सचिव लोकचंद भसारकर, प्रभारी सरपंच मंगला मुनघाटे यांच्यावर कारवाई करण्यात येऊन अफरातफर केलेल्या रक्कमेची वसुली करण्यात यावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

झालेल्या ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव जि. के.उके, सरपंच मंदा उरकुडे, उपसरपंच मंगला मुनघाटे, सदस्य बंडू पोहनकर, गुणवंत ढोक, दीपक नगराळे, शुभांगी चंदनबावणे, गीता चिडाम व ग्रामसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.

डीएससी पासून सरपंच अलिप्त?

ग्रामपंचायतचे पैशाचे व्यवहार ऑनलाइन करण्यात येतात. यासाठी सरपंच, सचिव यांची डिजिटल सही आवश्यक असते. मात्र सरपंच मंगला मुनघाटे या डीएससी विषयीच अनभिज्ञ आहेत. त्यांची डीएससी वापरून ग्रामसेवक यांनीच कारभार केल्याचे तत्कालीन सरपंच यांचे म्हणणे आहे.

एक वर्षापासूनचे प्रोसायडिंग गायब

ग्रामपंचायतीचा कार्यभार करण्यासाठी सभेत काय चर्चा झाली याविषयी प्रोसायडिंग वर नमूद असते. मात्र गैरव्यवहार झालेल्या काळापासून प्रोसायडिंग रजिस्टर गायब असल्याची माहिती विद्यमान सचिव घनश्याम उके यांनी दिली आहे.

Back to top button