बच्चू कडू : 'तिसऱ्या लाटेच्या केवळ भीतीने शाळा बंद ठेवणे अयोग्य' - पुढारी

बच्चू कडू : 'तिसऱ्या लाटेच्या केवळ भीतीने शाळा बंद ठेवणे अयोग्य'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा 
सद्यःस्थितीत कोरोनाची भिती हळूहळू का होईना कमी झालेली आहे. नवीन व्हेरीअंट येणार असल्याची थोडीफार भिती लोकांच्या मनात आहे. घरी बसून लोकांना दोन वर्ष झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचे. आज शाळा सुरू झाली आणि तिसरी लाट येण्याची शक्यता दिसली तरी पुन्हा शाळा बंद करता येतील, पण केवळ तिसरी लाट येण्याच्या भीतीने आज शाळा बंद ठेवणे योग्य वाटत नाही, असे स्पष्ट भूमिका राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
तिसऱ्या लाटेची चाहुल लागली, तरी आपल्याला केव्हाही शाळा बंद करता येतील. पण आता शाळा सुरू करणे आणि गंभीर परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे. आणि हा प्रयत्न सरकार करीत आहे. तरीही स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे आपण जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सूचित केले आहे. काही शंका आहे, तेथे शाळा सुरू होणार नाही. पण काहीच धोका नाही, तेथे मात्र शाळा सुरू राहतील.
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत होत्या. त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. यामुळे देशात नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत का, या प्रश्‍नावर राजकारणी एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. हे फक्त दिसण्यासाठी असते. पण या भेटी कशासाठी होत्या याचा, हे राजकारणी कुणालाही पत्ता लागू देत नाहीत. त्यामुळे अशा भेटीगाठींवर विश्‍वास ठेवू नका, असे कडू म्हणाले.

Back to top button