Lok Sabha 2024 : काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर; गडकरींना टक्कर देण्यासाठी विकास ठाकरेंच्या नावाची घोषणा | पुढारी

Lok Sabha 2024 : काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर; गडकरींना टक्कर देण्यासाठी विकास ठाकरेंच्या नावाची घोषणा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या विदर्भातील लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रपूर वगळता काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यात नागपूरसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दोन हात करणार आहेत.

रामटेक या राखीव मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार गटाच्या माजी जि. प.अध्यक्ष रश्मी बर्वे यांना संधी दिल्याने माजी मंत्री डॉ नितीन राऊत व कुणाल राऊत यांची संधी हुकली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सहकार विश्वाला संधी देत डॉ प्रशांत यादवराव पडोळे, गडचिरोली मतदारसंघात उच्चविद्याविभूषित नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीत रामटेक काँग्रेसने परंपरागत शिवसेनेकडून आपल्याकडे घेतला आहे तर वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला गेला आहे. येथून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी भाजपशी मुकाबला करण्यासाठी अनेक बड्या नेत्यांनी मैदानात उतरण्याचे किंवा उमेदवार देत भाजपशी दोन हात करण्याचे आदेश हायकमांडने दिले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल आपल्याला एका मतदारसंघात अडकून ठेवणे बरोबर नाही असा पवित्रा घेतल्याने पडोळे यांचा मार्ग मोकळा झाला. चंद्रपूरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर अशी चुरस अद्याप कायम आहे. गेल्यावेळीही या मतदारसंघात अंतिम क्षणी उमेदवार बदलले. साधारणतः होळी,धुळवड आटोपल्यावर 26,27 मार्च या शेवटच्या दोन दिवसातच महत्वाचे,प्रमुख पक्षांचे उमेदवार नामांकन अर्ज भरणार आहेत.अमरावतीला काँग्रेसने आमदार बळवंत वानखेडे यांना यापूर्वीच तिकीट जाहीर केले आहे. दरम्यान, महायुतीचे देखील आज दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस उमेदवारांवर वेट अँड वॉच भूमिकेत शेवटच्या टप्प्यात उमेदवार,मतदारसंघ बदल करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील जागांवर धक्कातंत्र वापरतील अशी शक्यता आहे. मात्र, आज घोषणा न झाल्याने इच्छुकांना,समर्थकांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Back to top button