विदर्भातून ५० हजार कोटींची मत्स्योत्पादन निर्यात शक्य : नितीन गडकरी | पुढारी

विदर्भातून ५० हजार कोटींची मत्स्योत्पादन निर्यात शक्य : नितीन गडकरी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : विदर्भात खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. येथे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी २००० कोटींची मत्स्योत्पादन निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

संबंधित बातम्या 

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव-ऍडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चा सत्र झाले. व्यासपीठावर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र वायडा, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पुल्केश कदम, प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे, सीआयएफईच्या प्राध्यापिका अर्पिता शर्मा, एटूएसटू एंटरप्रायजेसचे सहसंस्थापक अमोल साळगावकर, एमएम फिश सीड कल्टिव्हेशन प्रा. लिमिटेडचे संचालक सुखदेव मंडल, ऑस टेक इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख यांची उपस्थिती होती.

पुल्केश कदम यांनी शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत- कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे असल्याचे सांगत पारंपरिक मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज व्यक्त केली. मत्स्यशेतीवर दीर्घकाळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या ‘इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. संचालन डॉ. प्रकाश मालगावे यांनी केले.

तलावांची व्हावी स्वच्छता  ( मत्स्योत्पादन )

पारंपरिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी ज्या तलावांचे वय ४० ते ५० वर्षे जुने आहे, त्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंतही व्यक्त केली.

Back to top button