नागपूर : एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप | पुढारी

नागपूर : एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : देशाचे भविष्य मुले आहेत. एकल अभियान या मुलांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कौशल्य विकसित करून त्यांना घडविण्याचे महान कार्य करत आहे. या समर्पित कार्यातून देश लवकरच विश्वगुरू बनेल, असा विश्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.संजय दुधे यांनी व्यक्त केला.

एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, एकल अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी माधवेंद्र सिंह उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात चित्राताई जोशी म्हणाल्या की, मातीत खेळून खेळाच्या माध्यमातून आपला विकास करायचे ध्येय बाळगा. स्वत:च्या हितासाठी नव्हे, तर देशासाठी सुवर्ण पदक जिंकून द्या, आसे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले. पुढील वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद ओडिसाकडे देण्यात आल्याची घोषणा केली. प्रमोद अग्निहोत्री यांनी सूत्रसंचालन केले. तर एकल ग्राम संगठनच्या सचिव दीपाली गाडगे यांनी आभार मानले.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा वरघडे भावंडांना सुवर्णपदक

एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्तीमध्ये महाराष्ट्रचा दबदबा राहिला. ४५ आणि ४८ किलो वजनगटात भावेश आणि अर्जुन वरघडे या दोन्ही भावंडांनी सुवर्णपदक पटकावले.

कुस्तीमध्ये ४५ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या भावेश अर्जुन वरघडे ने दक्षिण उत्तर प्रदेशच्या सुरजला पछाडून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर ४८ किलो वजनगटात गौरव अर्जुन वरघडे याने दक्षिण झारखंडच्या रोहित कुमारला चितपट देत विजय मिळविला.

कबड्डीमध्ये उत्तराखंड, महाकौशलला विजेतेपद

एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील कबड्डीच्या अंतिम सामन्यात महाकौशल संघाने मुलांमध्ये तर उत्तराखंड संघाने मुलींमधून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या स्पर्धेत महाकोशल संघाने ब्रजमंडल संघाचा ३२-२० असा पराभव केला. महाकौशल संघाचा सुखदेव उत्कृष्ट खेळाडू ठरला. मुलींमध्ये पूर्व उत्तरप्रदेश संघाला ४९-२३ ने नमवून उत्तराखंड संघाने विजेतेपद जिंकले. संघाची भूमिका उत्कृष्ट खेळाडू ठरली.

हेही वाचा 

Back to top button